तिमिरातून तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी ह्या सणाचे आकर्षण काही वेगळेच आहेत. ६ दिवस चालणारी दिवाळी ही वेगवेगळ्या गोष्टींचे, नात्यांचे महत्त्व अधोरेखित करते. सगळीकडे असणारी रोषणाई, उत्साह, धांदल सगळं अगदी मनापासून जगावंसं वाटणार. आमच्या घरी दिवाळी येत आहे हे जाणवत ते घरामध्ये होणाऱ्या साफसफाई पासून, ते घरी बनवले जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांमुळे. दिवाळी सुरु होण्या आधीच फराळ संपू नये म्हणून आईची होणारी धडपड तर फराळ फस्त करण्याचा आमचा प्रयत्न सतत सुरू असतो.
दारापुढली सुंदर रांगोळी, चमकणारा आकाशकंदील, दिव्यांची रोषणाई सगळच अगदी सुरेख. मलासुद्धा रांगोळी काढायला आवडते. मी सुद्धा छाप्यांची रांगोळी दिवाळीत काढतो. रांगोळीमधले सुंदर रंग मला खूपच आकर्षित करतात. सगळ्यांबरोबर केला जाणारा फराळ, उडवणारे फटाके, सगळीच मजा. दिवाळीच्या ६ ही दिवसांचे महत्व हे ही काही वेगळेच आहे .
हिंदूधर्मामध्ये गाईला असाधारण महत्त्व दिले गेले आहे. दिवाळीची खरी सुरवात ही वसुबारस पासून होते. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळीचा नैवेद्य गाईला खाऊ घालतात. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी (आयुर्वेदाची देवता अथवा देवांचे वैद्य) चा जन्मदिन म्हणून ही साजरा केला जातो. ह्या दिवशी आमच्याकडे धणे आणि गुळाचा नैवैद्य दाखवतात.
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. ह्या दिवशी भल्या पहाटे उठून, सूर्योदया अगोदरच स्नानादी कार्ये आटोपून तयार होण्याची परंपरा आहे. ह्या सणाची एक पुरातन कथा आहे. असुरांचा राजा नरकासुर प्रागज्योतीसपूर( नेपाळचा दक्षिण प्रांत) येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर, देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली व देव आणि संतांच्या सोळा हजार कन्यांना आपल्या अंतःपुरात कैदेत ठेवले.
नरक चतुर्दशी च्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने
ह्या दानवाचा वध करून, त्या सर्व कन्यांची मुक्तता केली व अदितीची मौल्यवान कर्णकुंडलं परत प्राप्त केलीत. त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रातःस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्ती वर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे. ह्या दिवशी शुभ संकल्प घेण्याची रीत आहे. नरक चतुर्थीच्या दिवशी आमच्याकडे सगळे लवकर उठून उटणं आणि नारळाचे दूध लावून स्नान करतात. उटण्याचा सुगंध अगदी मनात रेंगाळत राहतो.
दिवाळीचा तिसरा दिवस, सर्वात महत्वाचा, लक्ष्मी पूजन. ह्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्राचीन काळात रात्री कुबेरपूजन करण्याची प्रथा होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु आता कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. लक्ष्मी देवी ह्या दिवशी पृथ्वीतलावर भ्रमण करून भरभराट व समृद्धीच्या आशिर्वादाची लूट करते असे मानल्या जाते. सायंकाळी लक्ष्मी पूजन केले जाते. ह्याच दिवशी प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मणा सोबत, १४ वर्षांचा वनवास सोसून अयोध्येत घरी परतले होते.
मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात. या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात.
दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला "यमद्वितीया" असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. भाऊबीजेच्या दिवशी खरं आकर्षण असते ते मिळणाऱ्या भेटवस्तूच. अशी ही दिवाळी नेहमीच मनात रेंगाळत राहते आणि आठवणींचा कप्पा तयार करत राहते.